Sunday, August 9, 2015

केल्याने देशाटन..

आज कचेरीमधे(ऑफीस) अजिबातच काही काम नव्हतं. आणि दुधात साखर म्हणजे बॉस रजेवर! अशी सुवर्णसंधी म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दहा ः)ः)
पण छे! या आंग्रजाळलेल्या वातावरणात मन रमत नाही हेच खरं. आता अवघी दोन वर्ष झाली मला इथे येऊन. नवरा म्हणाला होता मला, 'सुरुवातीला येईल आठवण. करमेनासं होईल. पण एकदा का इथे रुळलीस तर मग जायच नाव घ्यायची नाहीस.' मी अजूनही त्या दिवसाची वाट बघतीये. दोन वर्षांनी जेव्हा पहिल्यांदा भारतात गेलो तेव्हा जातानाच मला म्हणाला, 'आता गेल्यावर बघ, तुझ तुलाच वाटेल की नको यायल परत इकडे, नव्या देशातच बरं आहे'.
पण असही काही नाही झालं.
बाहेरचा परिसर, बाहेरच वातावरण कसही असलं तरी आपलं घर, घरातली माणसं, अंगण, परसदार, झालचतर घरातली प्रत्येक गोष्ट जी आपण आवडीने आणली, सजवली.. सगळं सगळं कुठेतरी आत मनाला मायभूमीची ओढ लावून ठेवतच नाही का.
काही काम नाही म्हणून वॉकसाठी बाहेर पडले. मनात विचार आला, का बरं अस होत कि इथे सगळं छान असूनही राहूनही, इथे आपलं मन रुळत नाही. खरचं अस काय काय आहे जे आपल्या घराची ओढ लावतं.
मी स्वतःलाच पडताळून पहात होते. ‘माझ्या मनातली अबोली सांगू लागली..’ खरं तर बरयाचं गोष्टी आहेत. म्हटलं तर छोट्या, पण तरीही महत्त्वाच्या.
आता अगदी साधी गोष्ट म्हणजे चहा. मी काही फार चहावेडी नाही पण घ्यावासा वाटतो चहा अधेमधे.
इथे लोकांना फक्त आणि फक्त कॉफीच वेड आहे. चहा घेणारे म्हणजे, असे माझ्यासारखे परदेशाहून आलेले. ऑफीसमधे एक तर ग्रीन टी नाहीतर डिपडिपवाला चहा.
आजूबाजूला एखादी टपरीवगैरे अशी मुळी संकल्पनाच नाही. अमृततुल्यचातर दूरदूरपर्यंत काही संबंध नाही.
दुधाची तहान ताकावर म्हणून मग मी अधेमधे डिपडिप चहा बनवते. बनवत असतानाच मला माहिती असतं की हा चहा काही माझ्या घशाखाली जाणार नाही. पण तरीही बनवते. पहिल्या २ घोटांतच माझी चहा पिण्याची हौस भागते. आणि मग तो चहा तसाच त्या कपात पडून रहातो.
रोज सकाळी ऑफीसला आल्यवर आणि दुपारी ४ वाजता हे असच होत.
असो त्यामुळे माझी चहा पिण्याची सवय तरी कमी होतेय. हेही नसे थोडके ः)

इथे जीवाभावाची मैत्री, सलोखा, मैत्रीमधील विश्वासार्हतेची ऊब - सुखदुःखांची देवाणघेवाण या सगळ्यांचा अभाव आहे. अगदीच व्यवहारी लोक आहेत अस नाही. बोलणे, एकमेकांचे अनुभव कथन करणे, सल्ला देणे/मागणे अस्ं सगळ असत ना पण त्यालाही एक चौकटसीमा आहे. हे शब्दांत नाही सांगता येणार. अनुभवानेच येईल लक्षात. कदाचित त्या मैत्रीमधे भावनेचा ओलावा नाही.
अळवाच्या पानावर पडलेला पाण्याच्या थेंबाशी त्या पानाचं जसं नात असत ना तस काहीसं.
एकमेकांना स्पर्शूनही, त्या स्पर्शाची जाणीव नसल्यासारखं
आपले देशवासीयही आहेत की! पण प्रत्येकजण गरजेपोटी एकमेकाला धरुन असतो. प्रत्येकाला आधाराची गरज आहे. अडीनडीला कोणीतरी असावं आपलं म्हणून बांधलेली मैत्री आहे. या मैत्रीमधे कोणती गृहितकं नाहीत. सगळ फॉरमॅलिटीजना धरुन चाललेलं.

दिवसभर ऑफिसच्या आंग्रजाळलेल्या वातावरणात राहिल्यावर, मायभाषेत बोलण्याची भूक खवळून उठते. मग ट्रेनमधून उतरल्या उतरल्या कोणालातरी फोन लावते आणि चालत चालत घरी पोचेतो अधाशासारखी बोलत रहाते. जणूकाही एखाद्या मुक्या व्यक्तीला वाचा फुटलीये आणि किती बोलू न किती नको अस झालय तिला.एखादं टम्म भरलेल्या भुशाच्या पोत्याला कोणीतरी छिद्र पाडाव आणि त्यातला भुसा सरसरं सरसरं खाली पडावा.. तस्स्ं ः)
चालता चालता परत ऑफिसजवळ पोचलेसुद्धा!
तर हा वॉक म्हणजे, 'त्या' वातावरणापासून थोडं वेगळं होऊन,मन आणि बुद्धि दोघींना ताजतवानं करणं.
या आणि अशा अनेक लहानसहान गोष्टी.. म्हटल आज मिळालाच आहे वेळ तर टायपूयात जरा...

नियमितपणे बोलत राहू अशी आशा ठेवून..

Thursday, November 7, 2013

ए सखी उलझन.. ना सखी सुलझन

६ चा अलार्म वाजला. तिघेहि उठले, ती, तिचा नवरा आणि ३ वर्षांचा मुलगा.
झटपट आवरुन दोघेजण(नवरा आणि मुलगा) बरोबरच घराबाहेर पडले मुलाला शाळेत सोडुन मग नवरयाने ऑफ़िस गाठायचे होते.
आता तिच्यासमोर पूर्ण दिवस होता. व्यायाम,अंघोळ,नाष्ता,देवपूजा झाली घड्याळाकडे पाहिले, आताशी दहाच वाजलेत.
तिच्या मनातली अबोली : ह्म्म सगळी काम आटोपली. काय करु आता? वेळच वेळ आहे माझ्याकडे. पण कधीकधी हा वेळ खायला उठतो मला..
३ महिन्यांपूर्वी अमेरिकेला जायचे या विचारने किती खुश होते मी! अहोंना US चा प्रोजेक्ट मिळाला.. मला नोकरीतून बदली मिळाली नाही त्यामुळे ती सोडावी लागली. वाईट वाटले थोडे नोकरी सोडताना पण, रोजचीच नोकरी आणि पाट्या टाकणे यातून सुटका होणार, मुलाकडे व्यवस्थित लक्ष देता येईल, आईपणाचं सुख पुरेपुर उपभोगता येईल या विचारांनी मनाला उभारी आली.
पण  इकडे आल्यावर ३ महिन्यांतच हा बहर ओसरला. तिकडे भारतात असताना सकाळी ६ ला दिवस सुरु व्हायचा. ऑफिसची तयारी करुन सकाळी ७ वाजताच मुलाला आईकडे सोपवायचे. झोपेतच असायचा तो! बस पकडून ८.३० पर्यंता ऑफिस गाठायचे. मग़ थेट संध्याकाळी ७.३० लाच घरी परत. मुलाला आईच्या घरून घ्यायचे आणि स्वतःच्य घरी पळायचे. १२ तासांच्या विरहानंतर आईला पाहिल्यावर माझा सोनुला एक मिनिटही मला सोडायचा नाही. मग पूर्ण संध्याकाळ त्याच्यासाठीच. त्याला घेऊन कसबसं घरातील काम उरकायच जेवायच नी झोपायच. झाल संपला दिवस. एक पाटी टाकून झाली.. नवरा आणि मी फक्त वीकेन्डलाच काय ते निवांत एकमेकांशी समोरासमोर बोलत असू. नाहीतर वीकडेजमधे फक्त फोनवरच आमच बोलण!
इथे आल्यावर एकदम मोकळ वाटल! कसलीच तकतक नाही. दिवस आपलाच. दिवसभर मुलाच खाणपिण, स्वैंपाक यात वेळ जातो. पण दिवसभर घरकाम करत रहायची सवय नाही त्यात इथे धुण्या-भांड्याला बाया नसतात. सगळ आपणच करा. AC मधली बैठी नोकरी सोडून ही काम करायची, हे काही अजून पचनी पडत नाही.
कधी मनात येत की आपण ही इंजिनियरची डिग्री घेतली ती कशासाठी? असं घरी बसून रांधा, वाढा करायचं होत तर इंजिनियरींगचा हट्ट कशाला?  ... पण मग मुलाच काय़ तो थोड कळता होईतो त्यच्याकडे लक्ष देणही गरजेच आहेच की!
हम्म्.. असो विचार करू तेवढा कमीच आहे.चला जरा संगणकावर हात फिरवू...
फेसबुकवर लॉगिन करु. तेवढाच वेळ जाईल.
अय्या ही तर समिधा आहे. ही पण US मधेच आहे वाट्ट. काय करते? ... करंटली नॉट वर्किंग! हाउसवाईफ़? अरे ही २ मुले तिचीच दिसताहेत... आणि हब्बी.. वर्किंग ऍट माइक्रोसॉफ्ट.. सह्ही.. तशी समिधापण हुशार बरं का.. मेरीटलिस्टमधे चमकलेली! मागच्या वर्षी भेटली होती मला.. टीमलीड होती, पी.म. साठी
ड्यू आहे अस म्हणाली.. सध्या घरीच आहे अस दिसतय.
ही .. नमिता.. हिला एक मुलगा आहे असे दिसतेय.. करंट सिटी सिडनी.. व्वा.. हिचा जॉब तर व्यवस्थित चालू आहे. आणि हे फोटोमधे कोण दिसतय.. ओ.. तिची आई आहे तर.. तरीच.. आई सांभाळत असणार मुलाला.. म्हणूनच तर तिचा जॉब व्यवस्थित सुरु आहे.
पण मग बरयाच मुलींची हिच गत आहे. लग्नानंतर मुलांना सांभाळणारे घरचे कोणी नसेल किंवा परदेशी गेलेले जोडपे असेल तर अशावेळी मुलींनी आपल्या पोरांना डे-केअरला ठेवण्यापेक्षा स्वतः घरी रहाणेच पसंत केलेय.
मला आठवतय.. शर्मिलाच्या बाबतीत तर अस नव्हत. तिचे सासू-सासरे घरीच असतात. पण सासूने सारखा तगादा लावला होता, 'आम्हाला तुझ्या नोकरीची गरज नाही'. नवराही तिला ऐकवायचा, 'मला तुझ्या पैंशांची गरज नाही'. तिने बरेच दिवस दुर्लक्ष केले. पण मग मुलीला सांभळणयावरून वाद झाले आणि मग तिला नाईलाजाने नोकरी सोडावी लागली. सध्या घरी शिकवण्या घेते आहे. शर्मिला खुपच हुशार आणि जिद्दी मुलगी. सॉफ्ट्वेअरमधली नोकरी मनापासून आवडायची तिला. परदेशगमनाची संधी चालून आलेली पण घरच्यांनी विरोध केल्यामुळे ती घेता आली नाही.
मुलींच्या बाबतीत हेच होणार असेल तर त्यांनी ग्रॅज्युएशनच्या आधीच विचार करायला हवा नाही का! म्हणजे इंजिनियरींगची एक सीट एखाद्या गरजू मुलाला तरी देता येईल. असही ओपन कॅटेगरीमधल्या मुलांसाठी ऍडमिशन घेणे कठीण झालय. त्यांना तरी याचा फायदा होईल.
एकदा तर चिडून मी नवरयाला म्हटल की तू घरी बस मी जाते नोकरीला. विशेष म्हणजे तोही तयार झाला. तो तयार झाला म्हटल्यावर माझा बायकी अहंकार (जसा पुरुषांचा पुरुषी अहंकार तसा स्त्रीयांचा बायकी अहंकार) सुखावला. पण शेवटी सारासार विचार केला, तो माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने मोठा, त्याच्याएवढा पगार मला लगेचच नाही मिळणार. मग म्हटल जाऊ देत सध्या तरी तूच कर जॉब...
पण मग आता काय? हा रिकामा वाटणारा वेळ भरून कसा काढायचा?
हम्म्.. एक करता येईल.. ऑफिसच्या रुटीनमधे असताना ज्या ज्या गोष्टी कराव्याशा वाटायच्या पण वेळेअभावी करता येत नव्ह्त्या त्या सगळ्या मनसोक्त करुयात. सगळे पुराणे छ्ंद जोपासूयात. लेखन, कार्डस बनवणे, फोटोग्राफी, गायन... खरचं की... हे मला आधी का नाही सुचले..
बिचारा नवरा त्याला अशी संधी कधी मिळायची नाही. आपल्याला मिळते तर तिचा पुरेपूर फायदा घ्यायला हवा..
असं म्हणत तिने तिची पेटी काढली, धूळ झटकली. गाण्याच्या क्लासची जुनी वही काढली आणि भैरवी गायला सुरुवात केली... 'जागो मोहन प्यारेSS  जाSSगो ' :):)

Wednesday, October 13, 2010

प्रिय मैत्रिणीस...


किती दिवस झाले हे नक्की सांगता येणार नाही... पण आपण दोघीच बसून ,चहाचे घोट घेत निवांत गप्पा मारतोय, असा प्रसंग बरेच दिवसात झाला नाही ग. का ग असं झाल?
एकमेकींना भेटणं, विचारपूस करण, एकमेकींबरोबर खरेदीला जाण, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणं, फोनवर बोलत रहाण, एकमेकींना प्रोत्साहन देत रहाण.... हे सगळ अगदीच कमी होऊन गेलय.. हो ना सखे!

तू कधीही हाक मारलीस तरी धावत होते तुझ्यासाठी. तू नसतानाही तुझ्या घरी काही मदत लागली तर करत होते. तुझं कोणतही काम असेल आणि तुझ्याबरोबर जायच असेल तर तुला नाही म्हणण मला कधी जमलच नाही. मैत्रीच नातच अस असत गं... पण हळूहळू काळाबरोबर हे बंध सैलावत गेले. कोणतही नात असू देत, ते दोन्ही बाजूंनी समजूतीने आणि प्रेमाने जपलं गेल तर ते तग धरुन रहात आणि फुलून येत. पण तस नाही झाल ना तर त्याच ओझ होत आणि ते त्या दोन व्यक्तिंपैकी कोणा एकासाठी जड बनून रहात.
खूप निखळपणे ही मैत्री जपण्याचा प्रयत्न केला मी. पण हळूहळू काही गोष्टी अशा उलगडत गेल्या की मीसुद्धा या नात्यातून अंग काढून घेतलं. तुझ्या मनात माझ्या बद्दल काय असूया होती कोणास ठाऊक?पण प्रत्येक वेळी तू माझ्यापेक्षा हुशार/व्यवहारचतुर आहेस हे जाणवून घेऊन स्वतःच समाधान करुन घ्यायचीस. तुझ हे वागण मला बरयाचदा जाणवल. पण त्याच मला काहीच वावग नव्हत गं. पण आपल्या शाळेतल्या बाईंसमोरही तू तोच विषय नेहमी उगाळत बसायचीस, ज्यातून तु हेच अभिप्रेत करायचीस की 'शालेय शिक्षणात जरी तू माझ्यापेक्षा हुशार होतीस तरी आता शिक्षण पूर्ण करुन नोकरीला गल्यावर मी तुझ्यापेक्षा कुठेच कमी नाही!'असू दे ना गं, चांगली गोष्ट आहे. पण हे बोलून दाखवल्याने तुला मोठेपणा प्राप्त झाल्यासारख वाटल का!

तू कधीही हाक मारावीस आणि मी काही विचार न करता घरातून निघाव, भले मला त्यासाठी आई-बाबांचा ओरडा खावा लागला तरी चालेल, त्याची पर्वा नाही केली मी! पण मला जेव्हा गरज पडली तेव्हा मात्र तू वेळ असूनही कारणं देऊन यायच टाळलस. खूप वाईट वाटल गं मला. या गोष्टी जाणवूनही मी कानाडोळा करत राहिले. पण जसजशी जाणिव तीव्र होत गेली तसा मैत्रीचा एकएक धागा तुटत राहिला. आता मीहि वागण्यात थोडी औपचारिकता ठेवून असते. अर्थातच त्याबद्दलचे टोमणे ऐकावे लागतातच मला तुझ्याकडून किंवा तुझ्या घरच्यांकडून! पण ते ठीक आहे. हे ऐकून सोडूनही देता येत. पण आपल्या माणसांकडून मनाला झालेल्या जखमां लवकर भरुन निघत नाहीत. काही नात्यासाठी एक लक्ष्मणरेषा आखलेलीच बर असतं. त्या रेषेपलीकडे आपण जायच नाही आणि तिच्या आत समोरच्याला प्रवेश द्यायचा नाही. दोन्ही बाजूची मने अलवार रहातात.. भावनांचा गुंता नाही होत. आणि अशा नात्याची जपणूक करण्याच ओझ नाही वाटत.

Thursday, May 20, 2010

सखा

तिच्या मनातली अबोली : खरच कसा आहे माझा सखा? त्याचं बोलण,चालणं, लहान-सहान गोष्टींसाठी माझ मत विचारणं, समजावण, समजावून घेण.. त्याची प्रत्येक हालचाल,व्यवहार मी टिपत रहाते. लग्नाआधी अनोळखी असे आम्ही आता एकमेकाना समजू लागलोय. आवडतोय त्याचा सहवास मला!!
पण मग अस का होत कधीकधी.. लग्नाआधीचं स्वच्छंदी आयुष्य आठवतं.. बेफिकीर.. म्हटल तर थोड बेजबाबदारही! शाळा,कॉलेज,नंतर जॉब, मित्रमैत्रीणी, भटकंती, सिनेमे, खादडणे...बस्स्स हेच विश्व!!!
थोडी चिडचिड होते माझी. रोज घरातला पसारा आवरा,स्वयंपाक-पाणी करा, कपडे-भांडी आवरा..मीच का हे सारख करत रहाव... किती कामं पडलीयेत आजची. फर्निचरच्या कामाच पसारा पडलाय, टाईल्सचे काम सुरु आहे तो पसारा आवरायचाय, स्वयंपाक व्हायचाय अजून...
७.३० ची वेळ. दारावरची बेल वाजते. ती दार उघडते. दारात सखा.
तो : हाय!!
उत्तरादाखल तिच एक स्मितहास्य!
मनातल्या अबोलीला शांत करत ती स्वयंपाकाच्या तयारीला लागते.

तो शांतपणे आत येतो. फ्रेश होतो. धुण्याचे कपडे मशिनला लावून देतो. घर झाडून घेतो.
टाईल्सवर पाण्याचा एक हात मारतो.

इकडे स्वयंपाकघरात - भात,भाजी,वरण झालय, कणिक मळलीये आता पोळ्या लाटण्याची तयारी सुरु आहे. इतक्यात फोन वाजतो. सासूबाईंचा फोन. फोनवर बोलण्यासाठी ती निघून जाते. अर्धातास बोलून झाल्यावर, फोन ठेवून आत येते, बघते तर.. शेवटची पोळी तव्यावर भाजली जातेय. पोळी भाजून तो उठतो.

तो : अरेच्चा! कपडे वाळत घालायचेत, झाले असतील. मी जातो. तू हा थोडा पसारा आवरुन घे. आज ऑफीस-मीटिंग्जमधे भरपूर मारामारी झालीये. डोकं भणभणतयं. छानपैकी जेवण करू आणि शांतपणे झोपू.

ती स्तब्धपणे बघत राहिलेली...
तिच्या मनातली अबोली : किती निरपेक्षपणे काम करतो माझा सखा! आणि मी इतकी व्यवहारी का होते? माझी मलाच लाज वाटतेय.
ती डोळे भरुन त्याच्याकडे पहाते आणि त्याला घट्ट अलिंगन देते.
तिच्या मनातली अबोली साश्रू नयनांनी फुलत रहाते.

Friday, August 21, 2009

अबोलीचे बोल

कधी असं होत का, की बोलायची खूप इच्छा असते पण शब्द ओठातूनच माघार घेतात, अबोल होतात. असं का होत याची कारण वेगवेगळी असू शकतात. पण हे अबोल झालेले शब्द त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित जागा शोधू लागतात आणि असा सुरक्षित कोपरा मिळाला की धो-धो बरसून जातात. नाही बरसले, तर मात्र तडकतात आणि फुटून जातात. पण फुटताना उडालेले कण निखारयासारखे, आपल्याच माणसाला चटके देऊन जातात. आणि या दोन्ही शक्यतांमधले काहीच झाले नाही तर हेच शब्द गोठून जातात...आपल्याला ऐकणार कोणीच नाही असं म्हणून आतल्या आत झुरत रहातात. या गोठलेल्या शब्दांना प्रवाहित करण्याचा हा एक प्रयत्न!